ठाणे : अवेळी झालेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्रातील कांदा, डाळींब आणि द्राक्ष यांच्या पन्नास टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम या तीनही पिकांची टंचाई व महागाई होण्यात होणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे तातडीने उत्तर महाराष्ट्रात धाव घेणार आहेत. निफाड, दिंडोरी, नाशिक हे तीन तालुके द्राक्षाचे कोठार आहेत. परंतु त्यातले पन्नास टक्के पीक अवेळी पावसाने नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच अवस्था डाळींब पिकाच्या बाबतीत सटाणा, मालेगाव, कळवण या तालुक्यातील डाळींबांची झाली आहे. त्याच प्रमाणे लासलगाव, चांदवड, सिन्नर, येवला, देवळा या तालुक्यात कांद्याचे पीक प्रचंड प्रमाणात येते. परंतु अवेळी पावसाने शेतातील कांदा आणि चाळीतील कांदा अशा दोन्हीही पीकाचे नुकसान केले आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारकडून अजून पर्यंत त्याची साधी दखली घेतली नाही. प्रशासकीय पातळीवर तर त्याबाबत साधा शब्दही उच्चारला गेला नाही. त्यामुळे राज्यात सरकार आणि प्रशासन आहे की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन या संकटग्रस्त दिलासा देण्यासाठी व त्यांचे प्रश्न आँखो देखा हाल स्वरुपात मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निफाडचे आमदार अनिल कदम हे त्यांच्या या दौऱ्याची आखणी करणार आहेत. आपल्या दु:खाची दखल सरकारने नाहीतर विरोधी पक्षाने घेतली हे पाहून या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (विशेष प्रतिनिधी)
फडणवीस सरकारची गत म्हशीसारखी!
By admin | Published: November 19, 2014 11:09 PM