फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं, पाटील कुटुंबीयांवरील कारवाईवरुन मुंडेची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:50 AM2018-12-27T08:50:07+5:302018-12-27T08:51:35+5:30
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस सरकारवर जहरी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको
मुंबई - विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या धुळ्या दौऱ्यावरुन लक्ष्य केले आहे. तसेच फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचे असल्याची टीका मुंडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. सरकारच्या या कारवाईचा निषेध मुंडे यांनी नोंदवला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फडणवीस सरकारवर जहरी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर @Dev_Fadnavis सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध, असे ट्विट मुंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येणार असल्याने दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाऱ्या विखरण ता.शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सहा वाजेपासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते.
दुपारी मुख्यमंत्री दोंडाईचा येथून गेल्यानंतरसुद्धा नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, मी 24 डिसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरिही मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले. त्यामुळे आता स्वत: मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. दरम्यान, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळेस मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर @Dev_Fadnavis सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध. pic.twitter.com/yZHZJMYkYP
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2018