फडणवीस सरकारने आदिवासींना दिलेली आश्वासने पाळली नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 04:18 AM2018-11-20T04:18:27+5:302018-11-20T04:19:48+5:30
फडणवीस सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली. मात्र, आदिवासींना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. फडणवीस सरकारची ध्येय-धोरणे भ्रष्ट असून, मूळ आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही.
मुंबई : फडणवीस सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली. मात्र, आदिवासींना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. फडणवीस सरकारची ध्येय-धोरणे भ्रष्ट असून, मूळ आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आदिवासी घटनादत्त अधिकारांपासून आजही वंचित आहेत, असे प्रतिपादन अन्यायग्रस्त आदिवासींचे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी सोमवारी मुंबई पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
महादेव कोळी, हलबा कोष्टी, माना, गोवारी, टोकरे, मल्हार कोळी, मंनेवर जमातींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे; तसेच आदिवासी खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, जात पडताळणी समितीतील तोतया संशोधन अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करावे, जात पडताळणी समितीत मानव वंश शास्त्रज्ञांचा समावेश करावा इत्यादी मागण्यांसाठी आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन छेडले होते. या वेळी दशरथ भांडे यांनी महादेव कोळी जमातीच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
दरम्यान, विदर्भ मराठवाडा कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातून महादेव कोळी, माना, गवारी, हलबा कोष्टी, ठाकर, टोकरे, मल्हार कोळी, मांनेवर जमातीचे आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
आदिवासी बांधवांचे न्याय आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या भागांतील आदिवासी दुर्लक्षित राहिले आहेत. अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांच्या लढ्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आदिवासी जमातीबाबतीत सरकारच्या ज्या चुका झाल्या आहेत त्या राज्य शासनाने सुधाराव्यात, यासाठी हे आंदोलन आहे.
- प्रकाश आंबेडकर,
अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ.