लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल, याविषयी या नेत्यांचे मत फडणवीस यांनी जाणून घेतले.
मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित मिश्र यांच्या ‘दीप कमल फाउंडेशन’ या संस्थेच्या ‘अटल चेतना’ या पुस्तिकेचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय प्रवासाबाबत मनोगत व्यक्त करून त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा आपल्या भाषणात घेतला.
राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती व अराजकता माजविणाऱ्या शक्तींकडे राज्य सरकाकडून झालेले दुर्लक्ष याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला माजी आमदार वीणा प्रेमकुमार शर्मा, माजी उपमहापौर अरुण देव, ईशान्य मुंबई माजी जिल्हाध्यक्ष दिलीप हजारे, मध्य-दक्षिण मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप गोडांबे, महिला आयोगाच्या माजी सदस्य नफिसा हुसेन, आदी उपस्थित होते. अमरजित मिश्र यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
............................