'भाजपात फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, तिकीट कापलेल्या तावडेंना सरचिटणीस केलंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 03:13 PM2021-11-30T15:13:41+5:302021-11-30T15:14:17+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते.
मुंबई - अल्पसंख्यामंत्री नवाब मलिक आणि भाजपा नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातही गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉनची जागा कशी विकत घेतली, याचे पुरावे फडणवीसांनी दिले होते. त्यामुळे, या नेत्यामधील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. आता, मलिक यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील प्रश्नावरुन मलिक यांना फडणवीसांची भाजपातील उंची कमी झाल्याचं मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो." एवढेच नाही, तर "आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा...," असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या या पश्चातापाच्या विधानसंदर्भात मलिक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मलिक यांनी फडणवीस सत्तेशिवाय राहूच शकत नसल्याचं सांगितलं.
चीडिया चूग गयी खेत, अब पछताए का होये, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरील पश्चातापवर मलिक यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच, सत्तेशिवाय फडणवीस यांना राहताच येत नसल्याचं त्यांनी 2 वर्षांपूर्वी सिद्ध केलं, अद्यापही ते हेच म्हणतात की मला वाटत नाही की, मी मुख्यमंत्री नाही. पण, फडणवीस यांना 2 वर्षांनंतर खरी परिस्थिती स्विकारल्याचं दिसून येतंय.
फडणवीसांचं भाजपमधील महत्त्व कमी
देवेंद्र फडणवीसांचं भाजपमधीलमहत्त्व कमी होत चाललंय, भाजपामध्ये त्यांचे जे अंतर्गत विरोधक होते, तावडेंसारखे लोकं ज्यांना तिकीट नाकारण्यात आले, आता ते मोठे होत आहेत. भाजपमधील अंतर्गत राजकारण बदलतेय असे दिसून येते, असे म्हणत मलिक यांनी फडणवीस यांचे पक्षातील महत्त्वा कमी होत असल्याचं म्हटलंय. कोणाला नेतृत्व द्यायचं हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं, ते आज भाजपचे देशाचे सरचिटणी बनले आहेत. आता, 2-3 महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तावडेंना आता पंतप्रधानांकडे थेट एक्सेस निर्माण झाले आहेत. म्हणजे हे कुठेतरी बदलाचे संकेत असल्याचंही मलिक यांनी म्हटलं.