Join us

तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सहकार्य करू; भुजबळ-फडणवीस बैठकीत काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:31 PM

ओबीसी आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, किंवा त्याचं आम्हाला राजकारणही करायचं नाही. मराठा आरक्षणावेळी आम्ही कशारितीने इम्पेरियल डेटा जमा केला, जो सर्वोच्च न्यायलयानेही ग्राह्य ठरवला, आताही आपल्याला तो कसा जमा करता येईल, हे मी छगन भुजबळ यांना सांगितलं.

ठळक मुद्देमी तुमच्यासोबत काम करेल, सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं. त्यामुळे तुम्ही नेतृत्व करा आम्ही सहकार्य करू, गरज पडल्यास मी नोट्सही काढून देतो, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - राज्याचे ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच राजकीय आरक्षण कसं टिकवायचं याबाबत चर्चा झाल्याचे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण परत मिळवणं शक्य असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

ओबीसी आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, किंवा त्याचं आम्हाला राजकारणही करायचं नाही. मराठा आरक्षणावेळी आम्ही कशारितीने इम्पेरियल डेटा जमा केला, जो सर्वोच्च न्यायलयानेही ग्राह्य ठरवला, आताही आपल्याला तो कसा जमा करता येईल, हे मी छगन भुजबळ यांना सांगितलं. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

मी तुमच्यासोबत काम करेल, सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं. त्यामुळे तुम्ही नेतृत्व करा आम्ही सहकार्य करू, गरज पडल्यास मी नोट्सही काढून देतो, असे फडणवीस यांनी म्हटले. सध्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, फेब्रुवारी महिन्यात मेजर निवडणुका होणार आहेत. त्याअगोदर, हे सगळं करणं आवश्यक आहे, ते होऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

भुजबळांची भूमिका काय

केंद्र सरकारने एसईसीसी डाटा उपलब्ध करून दिल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा तयार करणे अधिक सोपे जाईल, अशी भुजबळ यांची भूमिका आहे. हा डाटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला द्यावा अशा मागणीचा ठराव राज्य विधिमंडळाने अलिकडेच मंजूर केला होता.केंद्र सरकारकडे आणि विशेषता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फडणवीस यांनी वजन वापरावे आणि हा डाटा महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटून केली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसछगन भुजबळअन्य मागासवर्गीय जातीओबीसी आरक्षण