मुंबई - भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा शरद पवारांसह पवार घराण्यावर टीका केली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले आहेत, तेव्हापासून त्यांनी पवार कुटुंबावरील वादग्रस्त विधाने टाळली आहेत. मात्र, पडळकरांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्यांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं. आता, पडळकरांच्या वक्तव्याचा समाचार त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.
अजित पवारांचं नाव घेत त्यांनी हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, हा वाद रंगला असता राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यासंदर्भात माध्यमांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केली. त्यावेळी, फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले.
मला असं वाटतं की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले आहेत.
काय म्हणाले होते पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर पडळकर म्हणाले की, 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे', अशी टीका त्यांनी यावेळी केली. पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटले. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली. गोप्या म्हणत पडळकरांना डुकराची उपमा मिटकरी यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा पडळकरांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं.