फडणवीस -उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर झाली चर्चा!
By यदू जोशी | Published: September 12, 2019 08:47 PM2019-09-12T20:47:34+5:302019-09-12T20:48:31+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत चर्चादेखील केली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
- यदू जोशी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती कधी होणार, कशी होणार याबाबत कमालीची उत्सुकता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत चर्चादेखील केली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री झालेल्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. जवळपास एक तास मुख्यमंत्री मातोश्री होते. जागावाटप आणि आगामी निवडणुकीची रणनीती या चर्चेत ठरवण्यात आली. युतीतील जागावाटपाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुचविलेला फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितला.
सूत्रांनी सांगितले की युतीचा फॉर्मुला या बैठकीत जवळपास निश्चित झाल्याने उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना युती निश्चितपणे होणार असा विश्वास व्यक्त केला. युतीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करण्यापूर्वी जाहीर व्हावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. मात्र तसे होऊ शकले नाही. तथापि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर युतीबाबत निश्चिंत झालेले मुख्यमंत्री शुक्रवारपासून महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू करीत आहेत.