Join us

DG जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरुन फडणवीस चिडले, सरकारवर टीकेचे बाण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 5:52 PM

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला काल पूर्णविराम लागला आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला काल पूर्णविराम लागला आहे.

मुंबई -  महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या याबाबतच्या प्रस्तावाला काल मंजुरी दिली असून नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्या हाती सोपवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रतिनियुक्तीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.  

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेला काल पूर्णविराम लागला आहे. जयस्वाल यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. ती विनंती मान्य देखील  करण्यात आली होती. पोलीस दलात केलेल्या बदल्या जयस्वाल यांना पटत नव्हत्या. या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका, असेही जयस्वाल यांनी सांगितल्याचे समजते. नक्षलग्रस्त भागात नियुक्ती सक्तीची हवी, असाही जयस्वाल यांचा आग्रह होता. त्यात २२ आयपीएस अधिकारी नक्षलग्रस्त भागात गेलेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले होते. जयस्वाल हे केंद्रात होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे विनंती करून जयस्वाल यांना राज्यात परत आणले. त्यांना १ जुलै २०१८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा मान देण्यात आला होता.

जयस्वाल यांच्या या प्रतिनियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. अतिशय कार्यक्षम असे डीजी महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, डीजींना कुठेही विश्वासात न घेता कारभार चालला आहे. पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे, तो जरी गृहमंत्रालयाच्या अधिकारात असला तरी, त्याची स्वायत्ता आहे. सरकारने सुपरवायझर म्हणून या विभागाकडे काम केलं पाहिजे. पण, लहानातल्या लहान बदल्यांपासून ते अनेक गोष्टीत हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच, डीजींना हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी प्रतिनियुक्ती घेत आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.  

सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी वरिष्ठ आयपीएस आधिकारी मैदानात आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक बनले होते.  सुबोध जयस्वाल हे केंद्राच्या सेवेत गेल्यानंतर त्यांच्या जागी आता नवे महाराष्ट्र पोलीस महासंचालक येणार आहे. सुबोधकुमार कुमार जयस्वाल यांच्यानंतर वरिष्ठ असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम किंवा गृहनिर्माण पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र १९८७ बॅचमधील कनकरत्नम हे उद्या ३१ डिसेंबर २०२० रोजी निवृत्त होत आहेत. तर बिपीन बिहारी हे मार्च २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपोलिसमुंबईसरकार