मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आमच्याकडे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आहेत, पण हे ऐकायला ज्यांनी प्रश्न विचारले ते हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील भाषणाला सुरुवात केली. त्याचवेळी, सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले अन् व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. विधानसभेतील उत्तरावेळी आपल्या फेसबुक लाईव्हवरुन फडणवीसांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं.
मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.
देशातील सर्वात मोठं जम्बो हॉस्पीटल आपण केलंय. कोरोनावर महाराष्ट्र सरकारने मोठं काम केलंय. केंद्रीय आर्थिक अहवाल तपासणी केली. ज्यांनी नोटबंदीवेळी काम केलं, तेच या समितीचे अध्यक्ष आहेत. ते डॉक्टर आहेत, पण अर्थशास्त्राचे डॉक्टर आहेत. आपत्तीकाळात वैद्यकीय शास्त्राचा कंपाऊंडर बरा की, अर्थशास्त्राचा डॉक्टर?. या समितीने कशावरुन निष्कर्ष काढले, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. बिहारला समोर धरुन हे निष्कर्ष काढले आहेत, पण बिहारमधील कोविड परिस्थितीची आकडेवारी कशीय हे आम्हाला माहितीय, कशी आकडेवारी आली, कसे फोन कॉल्स यायचे, असे हे निष्कर्ष. आम्ही खोटेपणा कधीच केला नाही, खोटेपणा आमच्या रक्तात नाही. आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, बंद दाराआडही नाही, यापुढेही बोलणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.