Fahad Ahmad Sana Malik Anushaktinagar Assembly: अजित पवारांनी नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी पार्टीच्या युवा नेत्याला राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी जाहीर केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फहाद अहमद यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी यावेळी निवडणुकीतील मुद्दे काय असतील, याबद्दलही भाष्य केले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना फहाद अहमद म्हणाले, "समाजवादी पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस... दोन्ही पक्षांची मूळं समाजवादाशी जोडलेली आहेत. मला शरद पवारांनी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला. यातून हेच दिसतंय की महाराष्ट्राच्या निवडणुकीत ना पक्ष महत्त्वाचा, ना व्यक्ती महत्त्वाचा, ना निवडणूक चिन्ह; महत्त्व फक्त एका गोष्टीला आहे की, ज्यांनी महाराष्ट्राला लुटले, जे महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत छेडछाड केली, त्यांच्याविरोधात आम्ही सर्वजण एक आहोत", अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्रातील जनता निवडणुकीची वाट बघतेतय - फहाद अहमद
"इंडिया आघाडी एक झाली आणि ४०० पार वाल्यांना आम्ही २४० वर गुडघे टेकायला लावले. आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी, जो महायुतीचा भ्रष्टाचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावला यावरून आम्ही येणाऱ्या काळात... खूप कमी वेळा असं होतं की जनता निवडणुकीची वाट पाहत असते, महाराष्ट्रातील निवडणुकीची जनता वाट बघत आहे", असे फहाद अहमद म्हणाले.
अणुशक्तीनगर निवडणुकीत कोणते मुद्दे मांडणार?
फहाद अहमद म्हणाले, "चार अजेंडे आहेत. पहिला असा की, आज अणुशक्तीनगरची जी परिस्थिती आहे, ती बघितलं तर वाटत नाही, आपण मुंबई आहोत. पाण्याची व्यवस्था नाही. एक साहेब (नवाब मलिक) जे इथले १५ वर्ष आमदार होते, त्यांनी एकही महाविद्यालय सुरू केले नाही. रुग्णालय सुरु केले नाही. आज ड्रग्जचं केंद्र बनवून ठेवलं आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षेवर काम करू."
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी फहाद अहमद यांच्यासाठी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांकडे मागितली होती. अबू आझमी यांच्याकडे फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.