गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमधील स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग अयशस्वी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:33 AM2020-01-10T04:33:16+5:302020-01-10T04:33:19+5:30
पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलला स्वयंचलित दरवाजा लावून चाचणी घेण्यात येत आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलला स्वयंचलित दरवाजा लावून चाचणी घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांतून स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल सध्या चालविली जात आहे. मात्र गर्दीच्या वेळी दरवाजांचा हा प्रयोग कितपत साथ देईल, यावर शंका उपस्थित केली जात आहे.
धावत्या लोकलमधून पडून, धावत्या लोकलमधून खांब लागणे असे अपघात दररोज घडत आहेत. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रकल्प तयार केला आहे. मात्र प्रवाशी लोकल डब्याच्या आत जाऊन दरवाजा बंद होईपर्यंत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना तैनात केले आहे. चाचणीमध्ये तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. तर दरवाजे बंद केल्यामुळे खेळती हवा बंद झाली. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलच्या चाचणीचा अंतिम अहवाल रेल्वे बोर्डाला देणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.