सरगम सोसायटी आगप्रकरणी २५ दिवस उलटूनही बिल्डरला पकडण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:01 AM2019-01-24T05:01:30+5:302019-01-24T05:01:37+5:30

चेंबूरच्या १५ मजली सरगम सोसायटीला २७ डिसेंबरला भीषण आग लागली होती.

Failure to catch the builder after the 25-day cycle of fire incident in the Sargam Society fire | सरगम सोसायटी आगप्रकरणी २५ दिवस उलटूनही बिल्डरला पकडण्यात अपयश

सरगम सोसायटी आगप्रकरणी २५ दिवस उलटूनही बिल्डरला पकडण्यात अपयश

googlenewsNext

मुंबई : चेंबूरच्या १५ मजली सरगम सोसायटीला २७ डिसेंबरला भीषण आग लागली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला २५ दिवस उलटूनही जबाबदार असणाऱ्या बिल्डरला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तर दुसरीकडे २७ डिसेंबरच्या घटनेनंतर सोसायटीतील बंद झालेली लिफ्ट अद्याप सुरू न झाल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सरगम सोसायटीच्या बिल्डरने १५ व्या मजल्यावर आपत्कालीन स्थितीत उभी राहण्यासाठी बांधलेली जागा एकाला विकून त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना बाहेर पडताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या आगीत सुनीता जोशी, भालचंद्र जोशी, सुमन श्रीनिवास जोशी, सरला गांगर,लक्ष्मीबेन गांगर या पाच जणांना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये या बिल्डरविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र अजूनही या बिल्डरला अटक करण्यात न आल्याबद्दल सरगम सोसायटीच्या रहिवाशांंमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ही सोसायटी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील आहे. आगीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने उप मुख्य अभियंत्याची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत आग लागलेल्या इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा काम करत नसल्याचेही समोर आले होते. त्यामुळे म्हाडाने आपल्या अखत्यारीतील नव्या-जुन्या बांधकामासाठीचे नियम कठोर करण्याचा निर्णयही घेतला होता.
म्हाडाने स्थापन केलेल्या समितीने म्हाडासमोर जो अहवाल सादर केला त्यात हा सरगम सोसायटीचा बिल्डर दोषी आढळून आला आहे.
>बिल्डरची न्यायालयात धाव
सरगम सोसायटीच्या बिल्डरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेदेखील बिल्डरचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ बिल्डरला अटक करावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

Web Title: Failure to catch the builder after the 25-day cycle of fire incident in the Sargam Society fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.