गुन्हे दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

By admin | Published: August 14, 2016 03:18 AM2016-08-14T03:18:21+5:302016-08-14T03:18:21+5:30

बदलापूर रेल्वे स्थानकात झालेले ६ तासांचे रेल रोको आंदोलन हा पूर्वनियोजित कट नव्हता. या उत्स्फूर्त आंदोलनात रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसताना प्रवाशांवर गुन्हे दाखल

Failure to get passengers commuted to crime | गुन्हे दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

गुन्हे दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

Next

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात झालेले ६ तासांचे रेल रोको आंदोलन हा पूर्वनियोजित कट नव्हता. या उत्स्फूर्त आंदोलनात रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसताना प्रवाशांवर गुन्हे दाखल करण्यास रेल्वे पोलिसांनी प्रारंभ केल्याने बदलापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हा दाखल झालेल्या एकाही प्रवाशाला अटक केली, तर पुन्हा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवासी संघटना व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
सातत्याने होत असलेल्या उपेक्षेमुळे झालेल्या या आंदोलनाची दखल खुद्द रेल्वेमंत्र्यांनी घेऊन प्रवाशांच्या समस्या जाणूनही घेतल्या. मात्र, रेल्वे सुरक्षा बलाने या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केल्याने आंदोलकांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे. आंदोलकांच्या बाजूने आता बदलापुरातील राजकीय पुढारीदेखील पुढे सरसावले आहेत.
रेल रोको आंदोलन मागे घ्यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्याचे निवेदन दिले. एवढेच नव्हे तर खुद्द रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांना चर्चेसाठी पाठवले. या आंदोलनकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी १९ आॅगस्टला बैठक आयोजित केली. हे सर्व घडल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने मात्र सर्व आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांबाबत इतकी सौजन्यशील भूमिका घेतली असताना रेल्वे सुरक्षा बलाने कठोर पावले उचलण्याची काहीच गरज नाही, असे प्रवासी संघटना व स्थानिकांचे मत आहे. रेल्वे मंत्रालयाने त्वरित हस्तक्षेप करून आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकीकडे रेल्वे आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रण द्यायचे, तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायचे, हा दुटप्पीपणा आहे, असे स्थानिकांचे मत आहे.
१५ आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडावा, यासाठी रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्या प्रवाशांचे अटकसत्र रोखून धरले आहे. मात्र, सोमवारी स्वातंत्र्य दिन पार पडल्यावर बदलापूरमधील काही प्रवाशांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गुन्हे मागे घेण्यासाठी व कारवाई रोखण्याकरिता राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. आंदोलनात आघाडीवर असलेले व गुन्हे दाखल झालेले आंदोलनकर्ते भूमिगत झाले आहेत. (प्रतिनिधी)

‘रेल्वे आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या’
बदलापूरमध्ये रेल्वे प्रवाशांनी केलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जे आंदोलन झाले, ते उत्स्फूर्तपणे झाले आहे. हे आंदोलन शांततेत झाले असून रेल्वेचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Failure to get passengers commuted to crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.