मुंबई : संयुक्त राष्ट्रांकडून निर्धारित शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत २०३० सालापर्यंत एचआयव्हीचे उच्चाटन करण्याचे धोरण केंद्र शासनाने अवलंबिले आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात एचआयव्हीचे सावट कायम असल्याचे दिसते. १ एप्रिल २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात राज्यभरात एचआयव्हीचे १ हजार ५०९ बळी गेले आहेत. त्यात शहरातील ८८ रुग्णांचा समावेश असून ग्रामीण भागातील १ हजार ४२१ रुग्णांचा बळी गेला आहे.यंदाच्या वर्षातील मृत्यूंची संख्या २०१७-१८ सालाच्या तुलनेत अधिक आहे, त्या काळात राज्यात १ हजार ३६१ मृत्यंूची नोंद झाली होती. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शहरात केवळ ६ टक्के मृत्यूची नोंद झाली आहे, तर ग्रामीण भागात ९४ टक्के मृत्यू झाले आहेत. त्यात राज्यातील तीन जिल्ह्यात एड्सच्या बळींची संख्या अधिक आहेत. पुण्यात २७०, मुंबईत १२८ आणि सांगलीत १०३ मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यूंपैकी ८.५ टक्के मृत्यू मुंबईत झाले आहेत.एकीकडे एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या घटत असल्याचे हे दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यू संख्येत वाढ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात ४ हजार २६० रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत ७२ रुग्णांच्या संख्या नोंदविली आहे. या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत राज्यातील रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण भागात एचआयव्हीचे सावट कायम; मुंबईत १२८ जणांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 6:15 AM