Join us

पराभवाचे खापर पोलिसांच्या माथी

By admin | Published: May 02, 2015 5:04 AM

महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांनाच धमकवायला सुरुवात केली आहे. पराभवाचे खापर पोलिसांच्या

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांनाच धमकवायला सुरुवात केली आहे. पराभवाचे खापर पोलिसांच्या माथी मारत दुर्गम भागात बदलीला सामोरे जाण्याचे इशारे मिळू लागले आहेत.नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चुरशीची लढत झाली. सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्याकरिता अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील यावर पक्षश्रेष्ठींनी जोर दिला. तर अनेक उमेदवारांनी स्वबळावर रिंगणात उडी घेऊन विजय मिळवण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींकडून साम-दाम-दंड-भेद वापरण्यात आला होता. त्याकरिता प्रतिस्पर्धी उमेदवारांवर खोट्या तक्रारी देखील दाखल केल्या जाऊ लागल्या. दुसरीकडे तेच उमेदवार मतदारांवर पैशांचा तसेच भेटवस्तूंचा पाऊस पाडून विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लोकसभा, विधानसभा पाठोपाठ महापालिका निवडणुकीत देखील पोलिसांनी चोख भूमिका बजावली. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या चालींना लगाम लागला. अशा काही उमेदवारांना मतदारांनीच पराभूत केले आहे. पराभूत झालेल्या या उमेदवारांनी आता पोलिसांना आपले लक्ष्य केले आहे.आपला पराभव हा पोलिसांमुळेच झाल्याच्या तक्रारीही त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहेत. पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळेच आपला पराभव झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्या विभागात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले आहेत अशाच ठिकाणच्या पोलिसांसोबत हे प्रकार घडत आहेत. यामागे नक्की आहे कोण याचाही संभ्रम पोलिसांमध्ये निर्माण झाला आहे. बदलीची धमकी देणाऱ्यालाच कायदा शिकवला असता, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.