Join us

बदलत्या मुंबईचा वेध घेण्यात रेल्वेला अपयश! गिरणगावचे झाले सेवाक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 3:07 AM

गिरणगाव उद्ध्वस्त झाल्यानंतर एकविसाव्या शतकात या भागात झपाट्याने बदल होऊन त्याचे रूपांतर सेवा क्षेत्रात झाले. दादरपासून लालबाग, परळ, वरळीमध्ये मॉल, टॉवर उभे राहिले.

- योगेश बिडवईमुंबई : गिरणगाव उद्ध्वस्त झाल्यानंतर एकविसाव्या शतकात या भागात झपाट्याने बदल होऊन त्याचे रूपांतर सेवा क्षेत्रात झाले. दादरपासून लालबाग, परळ, वरळीमध्ये मॉल, टॉवर उभे राहिले. येथील सेवा क्षेत्रातील उद्योगात मोठ्या संख्येने लोक मुंबईबाहेरून लोकलने कामासाठी येऊ लागले. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत स्टेशनवर खूपच गर्दी वाढली. मात्र त्याचा वेध घेण्यास, आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने शुक्रवारचा दुर्दैवी अपघात झाला.गिरणगावातील कापड गिरण्यांचे भोंगे बंद झाल्यानंतर हळूहळू येथे टॉवर्स उभे राहिले. कापड गिरण्या असताना, अनेक कामगार याच भागांत राहत. त्यामुळे रेल्वेवर त्याचा भार पडत नसे. शिवाय तीन शिफ्टमध्ये त्यांचे काम चालत असल्याने रेल्वेची गर्दीही ठरावीक वेळेतच होत असे. पण गिरणगाव संपून सर्व्हिस इंडस्ट्री सिटी असे या भागाचे रूपांतर झाले.गिरणगाव बदलले...गिरणगावचा चेहरा बदलल्यानंतर आता येथे सॉफ्टवेअर्स, मनोरंजन कंपन्या, टीव्ही मीडिया आदी सेवा क्षेत्राची कार्यालये झाली आहेत.दादर व परळ एसटी स्टॅण्डपासून महालक्ष्मीकडे जाताना तसेच सेनापती बापट (तुळशी पाइप रोड) मार्ग, डॉ. आंबेडकर रोड व ना. म. जोशी (डिलाईल रोड) मार्ग व वरळी नाका भागात कॉर्पोरेट कार्यालये झाली आहेत. येथून परळ, करी रोड, लोअर परेल स्टेशनवर जाण्यासाठी दिवसभर शेअर टॅक्सी सुरू झाल्या आहेत.गिरणगावमधील कामगार दादर, लालबाग-परळ, चिंचपोकळी, वरळी याच भागात राहायचे. त्यामुळे या लोकल स्टेशनवर गर्दी नसायची. आता येथे काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक बाहेरून लोकलने येतात. त्यामुळे स्टेशनवरची गर्दी वाढली. पायाभूत सुविधांमध्ये मात्र बदल झाला नाही.- जयप्रकाश सावंत, कामगार चळवळीचे अभ्यासकदक्षिण मुंबईच्या तुलनेने भाव कमी झाल्याने कॉर्पोरेट क्षेत्र गिरणगावात स्थलांतरित झाले. येथे बँका, मॉल्स, हॉटेल्स, सेवा क्षेत्र सुरू झाले. मात्र पायाभूत सुविधा तशाच आहेत.- अजित सावंत, मुंबईच्या विकासाचे अभ्यासक- कुर्ला, परळ, प्रभादेवी, करी रोड, चिंचपोकळी आदी स्टेशनबाहेर पडल्यानंतर टॅक्सी स्टॅण्डकडे जाण्यासाठीचे रस्ते अरुंद आहेत.

टॅग्स :मुंबई