कृषी मेळावा ठरला शेतक-यांसाठी पर्वणी
By admin | Published: February 26, 2015 10:36 PM2015-02-26T22:36:40+5:302015-02-26T22:36:40+5:30
शिवार फेरी, भाजीपाला, वेलवर्गीय पीक, शेतकरी सन्मान, स्पे्र पंप वाटप, माहिती व गांडूळ खत प्रकल्प, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन अशा
रोहा : शिवार फेरी, भाजीपाला, वेलवर्गीय पीक, शेतकरी सन्मान, स्पे्र पंप वाटप, माहिती व गांडूळ खत प्रकल्प, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी कृषी मेळावा विविधांगी झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.
कृषी विभाग पंचायत समिती, रोहा यांच्यावतीने तालुकास्तरीय कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. गांडूळ खत प्रकल्प पुस्तिकेचे प्रकाशन उपसभापती अनिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत स्पे्र पंप वाटप करण्यात आले. जिल्हास्तरावरील कृषी प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या स्पर्धक शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. यामध्ये वारगुडा यांनी भाजीपाला विषयावर, नथुराम मगर यांनी कलिंगड, अनंता मगर यांनी भुईमूग, पोलीस अधिकारी व शेतकरी पिंगळा यांनी आदिवासी बांधव यांच्या शेतीबाबतच्या अडचणी व शासनाच्या योजनांबाबत मते व्यक्त केली. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांना शास्त्रोक्त माहिती देण्यात आली.
कृषी अधिकारी वर्गासोबत बारटक्केवाडा परिसरात कुंडलिकातीरावर शेकडो एकर जागेत लावलेला भाजीपाला, वेलवर्गीय फळभाज्यांची विस्तृत माहिती देत अधिकाऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांसमवेत शिवार फेरीचा आनंद घेतला. येथील भोपळा पीक सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला. पिकावरील कीड संरक्षक सापळा महत्त्वाचा होता. लागवडीबाबत तांत्रिक माहिती कृषी अधिकारी मेमाणे व काप यांनी शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी प्रदर्शनात मांडलेले फळ व भाजी पीक, भला मोठा भोपळा व मुळा शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले. पर्यटन केंद्राच्यावतीने उत्पादित वस्तूंचा स्टॉल व माहिती पुस्तक स्टॉलवरून शेतकरी उत्सुकतेने माहिती घेत होते. राजिप शाळा किल्ल्याच्यावतीने विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्याचे शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. तालुक्यातील शेकडो शेतकरी व कृषी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.