मुंबई : राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुरुवातीला सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
याबाबत बुधवारी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून वंचित लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रांमध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून, तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे केले जाणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे.