मुंबई - राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशन काळात सरकारला धारेवर धरण्याचं काम, सरकारला प्रश्नांची सरबत्ती करण्याचं काम विरोधकांकडून होत असतं. मात्र, याच अधिवेशन काळात काही गमती-जमतीही घडतात, अनेकदा आमदार महोदयांची फजितीही होते. राष्ट्रवादीचे आमदार आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम प्रसिद्धी झोतात असणारे अमोल मिटकरींचीच चांगली फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, सभागृहात अज्ञात व्यक्ती शिरल्याची तक्रार आमदार मिटकरींनी केली होती. मात्र, ती व्यक्ती राष्ट्रवादीचेच आमदार निघाले अन् मिटकरी तोंडघशी पडले.
अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहून सभागृहात अज्ञात व्यक्ती शिरल्याची माहिती १० मार्च रोजी दुपारी २.३२ वाजता दिली होती. त्यामध्ये, निळा शर्ट आणि कपाळावर गोल टिळा लावलेली ती व्यक्ती सभागृहातील बाकावर बसून परिषदेत सहभागी झाल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं होतं. मात्र, चौकशीअंत आणि सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोण नसून राष्ट्रवादीचे आमदार रमेश कराड हेच होते, असे निष्पण्ण झाल्याचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले.
उपसभापती निलम गोऱ्हे यांनी १३ मार्च रोजी यासंदर्भात माहिती देताना, सभागृहात आलेली निळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून आमदार रमेश कराड होते. मी स्वत: त्यांच्याशी फोनवरुन बोलले, ते ३० नंबरच्या त्यांच्या बाकावर बसले होते. सभागृहात दुसरी व्यक्ती आलीच नाही, याशिवाय मीही निळ्या रंगाची व्यक्ती कोण हा विचार करत असताना, आमदार रमेश कराड यांनी निळ्या रंगाच शर्ट घातल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानुसार, ही सत्य समोर येण्यास मदत झाली, असे निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
रमेश कराड यांना अमोल मिटकरी यांनी अनावधानाने ओळखले नसेल. पण, यातून सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह घेता कामा नये. सभागृहाच्या सुरक्षेत कुठेही त्रुटी नाहीत. रमेश कराड हेच सभागृहात होते, सभागृहात कोणी अतिरेकी आला नव्हता, असेही निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यापुढे मी काळजी घेऊन असे म्हणत अमोल मिटकरींनी झाल्या प्रकाराबद्दल एकप्रकारे खेद व्यक्त केला.