मुंबई : काळाचौकी येथील एक औषध विक्रेता बनावट औषधांची विक्री करत असल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी येथील कैलाश फार्मा या घाऊक विक्रेत्यावर कारवाई करत, ७५ हजारांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला, तसेच काळाचौकी पोलीस ठाण्यात एफआरआय नोंदविल्यानंतर, या दुकानाचा दुसरा भागीदार दिलीप कांतीलाल राठोड याला अटक करण्यात आली.मेयर आॅरगॅनिक प्रा.लि. या उत्पादकाने त्यांच्या ‘कॅल्सिमॅक्स ५००’ गोळ््यांचा शहरातील खप कमी झाल्याची माहिती देत, अशा प्रकारचे दुसरे बनावट औषध बाजारात राजरोसपणे विकले जात असल्याची शंका व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या गुप्तवार्ता व बृहन्मुंबई विभागाने धाड टाकून तपास केला. एका दुकानावर छापा टाकला असता, त्या विक्रेत्याने ‘कॅल्सिमॅक्स ५००’ सारख्या हुबेहूब दिसणाºया गोळ्यांचा साठा केल्याचे उघड झाले. कारवाईच्या दरम्यान हा साठा जप्त करण्यात आला.या औषधांचा नमुना तपासाकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या धाडीत आढळून आलेला वरील बनावट औषधांचा साठा आणि मूळ उत्पादक यांनी उत्पादित केलेल्या औषधी साठ्याच्या कार्टन व बिलिस्टर स्ट्रीपचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्यांच्या तपशिलात बरीच तफावत दिसून आली. यावरून धाडीत जप्त करण्यात आलेले औषध हे मूळ उत्पादकाने उत्पादित केलेले नसून, ते बनावटच असल्याचे निदर्शनास आले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पूनम साळगावकर, के. जी. गादेवार, दि. मा. खिंवसरा, आरती कांबळी या औषध निरीक्षकांनी डी. आर. गहाणे सहायक आयुक्त यांच्या सहकार्याने ही धाड घातली.>गुजरात कनेक्शन उघडया औषधाचा पुरवठा कैलाश फार्मा यांना समृद्धी ट्रेडींग वापी, गुजरात येथून होत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब तत्काळ औषध नियंत्रक, गुजरात यांना कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे औषध नियंत्रक, गुजरात यांनीसुद्धा आवश्यक तपास करून, कंपनीचा बनावट औषधांचा साठा जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.>भागीदारांविरुद्ध एफआयआरया प्रकरणी कैलाश फार्माचे भागीदार संजय कांतीलाल राठोड, दिलीप कांतीलाल राठोड, बिट्टू उर्फ विरल चंद्रेश शहा व इतर संबंधित अज्ञातांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यापैकी आरोपी दिलीप कांतीलाल राठोड याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.>अन्य कार्यालयांना सतर्कतेचा इशाराया बनावट औषधांची विक्री सर्वत्र होत असल्याचा संशय एफडीएला आहे. वरील कारवाईबरोबरच आणखी २० हजार रुपये किमतीचा साठा सानपाडा, नवी मुंबईतून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासनाच्या सर्व कार्यालयांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांच्या साहाय्यानेही अधिक तपास सुरू आहे.
बनावट औषधांचा साठा जप्त, काळाचौकीत एफडीएची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:29 AM