मुंबई : सौदी अरेबियातील उमराह या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या १०० प्रवाशांपैकी ५४ जणांना बनावट विमान तिकिटे दिल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी टुर्स अँड टॅÑव्हलचा व्यवसाय करणाऱ्या आदिल अहमद शेख (२९) याच्याविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार असीम मुश्ताक मनियार (२६) यांचा टुर्स अँड ट्रव्हलचा व्यवसाय आहे. हज आणि उमराह येथे जाण्यासाठी ते अन्य दलालांच्या मदतीने विमानसेवा पुरविण्याचेकाम करतात. ४ आॅक्टोबरला त्यांनी आदिल शेख याला कुवैत व इतीहादची १०० विमान तिकिटे बुक करण्याचे काम दिले आणि २४ लाख ५० हजार रुपये आदिलला दिले.आदिलने त्यांना १०० तिकिटांचे पी.एन.आर. नंबर दिले. यापैकी ४६ जणांना कुवैत विमानसेवेची तिकिटे देत, ती मंडळी पुढे निघाली. त्या पाठोपाठ अन्य ५४जण आंतराष्ट्रीय विमानतळावरून इतीहाद विमानसेवेने जाणार होते. पुढे विमानतळावर त्यांच्याकडील तिकिटे बनावट निघाल्याने एकच दैना उडाली. त्याने आदिलकडे याबाबत जाब विचारला, तेव्हा चुकून झाल्याचे सांगितले आणि लवकरच दुसरी तिकिटे उपलब्ध करून देतो, असे सांगून तो निघून गेला. प्रवाशांची ओरड वाढल्याने, मनियार यांनी अन्य दलालांच्या मदतीने५४ जणांच्या विमान तिकिटांची व्यवस्था करत त्यांना उमराह येथे पाठविले.या प्रकारानंतर मनियारने त्याच्याकडे तिकिटांचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्याने टाळाटाळ केली. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, मनियारने नागपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यामध्ये एकूण १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, नागपाडा पोलिसांनी आदिलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
५४ प्रवाशांना दिली बनावट विमान तिकिटे, साडेसोळा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 6:03 AM