मुंबई : विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण रोजगारपत्र बहाल केले जात असून, अशी कोणत्याही प्रकारची नियुक्तीपत्र कोणालाही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अशा नियुक्तीपत्रांना कोणीही बळी पडू नये, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नावाने बनावट पत्र तयार करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना नियुक्तीपत्र व प्रशिक्षण रोजगारपत्र देऊन पैशांची मागणी करण्यात आली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून, उमेदवारांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही बनावट नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण रोजगार पत्रामध्ये दावा केल्याप्रमाणे कोणत्याही रिक्त जागा नाहीत. भरती प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराकडून शुल्क मागितले जात नाही. त्यामुळे कोणीही अशा बनावट नियुक्तीपत्रांना बळी पडू नये, असे आवाहन कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी केले आहे.