पत्रा चाळीत १०० फ्लॅटचे बनावट पद्धतीने बुकिंग, ईडीने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:06 AM2022-04-13T06:06:41+5:302022-04-13T06:07:18+5:30
गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये १०० हून अधिक फ्लॅटची बनावट पद्धतीने बुकिंग केल्याची धक्कादायक माहिती
मुंबई :
गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये १०० हून अधिक फ्लॅटची बनावट पद्धतीने बुकिंग केल्याची धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आली आहे. या प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.
म्हाडाच्या तक्रारीनंतर मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. २०२० मध्ये एचडीआयएलचे सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. पुढे ईडीने हा गुन्हा तपासावर घेत धडक कारवाई सुरू केली आहे. ईडीने केलेल्या तपासात काही खरेदीदारांचे पत्ते बनावट असल्याचे आढळून आले. विकासकाने फसवणूक करण्यासाठी या बदल्यात नाममात्र रक्कम आकारून किंवा काहीच रक्कम न घेता डमी नावावर हे फ्लॅट बुक केल्याचे उघड झाल्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शनकडे फ्लॅट बुक करणाऱ्यांना आता ईडीने समन्स बजावले आहेत. २०११ मध्ये गुरू आशिषने प्लॉटचे वेगवेगळे भाग सात प्रभावशाली कंपन्या व प्रमुख बांधकाम व्यावसायिकांसह एफएसआयसह विकून १ हजार ३४ कोटी रुपये जमा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या बनावट फ्लॅटबाबत ईडीकडून अधिक तपास सुरू आहे.