दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:30 AM2018-06-13T05:30:38+5:302018-06-13T05:30:38+5:30
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरद्वारे मुंबईसह राज्यातील १०० हून अधिक जणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील हे कॉल सेंटर उद्ध्वस्त करत ५ जणांना सोमवारी अटक केली आहे.
मुंबई : दिल्लीतील बनावट कॉल सेंटरद्वारे मुंबईसह राज्यातील १०० हून अधिक जणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील हे कॉल सेंटर उद्ध्वस्त करत ५ जणांना सोमवारी अटक केली आहे.
माटुंगा येथील रहिवासी असलेले मोहन महादेव कोरगावकर हे तीन-चार कोटी रुपयांच्या कर्जाच्या शोधात असताना, एका टोळीने त्यांना एका नामांकित कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे पुढे करत, त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. कोरगावकर यांनी जवळपास १६ खात्यांवर ९३ लाख ५९ हजार ७९२ रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही कर्ज मिळत नसल्याने कोरगावकर यांना संशय आला. त्यांनी २९ मे रोजी माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एम. काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सरला वसावे, मारुती शेळके, पोलीस अंमलदार संतोष पवार, विकास मोरे यांनी अधिक तपास सुरू केला.