मुंबई: युकेमध्ये तुमच्या मुलाने अपघात घडवला असून तो त्याच्या जामिनासाठी लाखभर रुपये पाठवा असा कॉल करत हजारो रुपये उकळण्यात आले. कॉलर हा स्वतःला इन्स्पेक्टर संबोधत होता आणि ही फसवणूक असल्याचे उघड झाल्यावर मालाड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
तक्रारदार सोनल राईथट्टा (४८) या मालाडच्या आदर्श टॉवरमध्ये राहत असून त्यांच्या शेजारी दुष्यंत पटेल (६४) हे राहतात. तर त्यांचा मुलगा अगस्थ्य (२६) हा युकेच्या मँचेस्टर मध्ये नोकरी करतो. राईथट्टा आणि पटेल यांच्यामध्ये घरगुती संबंध आहेत. राईथट्टा यांच्या तक्रारीनुसार, १६ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास पटेल यांनी त्यांना घरी बोलवत त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून इन्स्पेक्टर विनोद शर्मा नावाच्या इसमाचा व्हाट्सअप कॉल आल्याचे सांगितले. अधिक माहिती देताना अगस्थ्यने युकेमध्ये अपघात केला असून तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. ज्याचा जामीन करण्यासाठी एक लाख रुपये त्याने दिलेल्या नंबरवर गुगल पे करायला सांगितले. मात्र पटेल यांच्याकडे पैसे पाठवण्यासाठी गुगल पे नसल्याने त्यांनी राईथट्टा यांना पैसे पाठवायला मदत करायला सांगितले. राईथट्टा यांच्यासमोर पुन्हा स्वतःचे नाव विनोद शर्मा सांगणाऱ्या व्यक्तीने फोन करत पैसे लवकर पाठवा असे पटेल यांना सांगितले. त्यानुसार पटेल यांच्या सांगण्यावरून राईथट्टा यांनी संबंधित क्रमांकावर गुगल पे केले.
मात्र त्याची लिमिट समाप्त झाल्याने उरलेले पैसे पाठवण्यासाठी भामट्याने नोएडा मध्ये ब्रांच असलेल्या बँक खात्याचा क्रमांक त्यांना पाठवल इंटरनेट बँकिंग द्वारे पैसे पाठवायला सांगितले. मात्र त्याच दरम्यान अगस्थ्यचा फोन आला ज्याने तो सुखरूप असून त्याने कोणाचाही अपघात केला नसल्याचे वडिलांना सांगितले. तेव्हा विनोद शर्मा ही व्यक्ती खोटे बोलून फसवणूक करत असल्याचे त्यांचे लक्षात आले. तेव्हा राईथट्टा यांनी या विरोधात मालाड पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.