मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दिवसाला हजारो नागरिकांचे कॉल येतात; यात पोलिसांकडूनही त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात फेक कॉलही येत आहेत. अशात चुकीची माहिती देणाऱ्यांना कोठडीची हवा खावी लागत आहे. नुकतेच मुंबई पोलिसांनी बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई केली आहे.मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात मुंबईत एकाच वेळी चार ठिकाणी बॉम्ब असल्याच्या कॉलने खळबळ उडाली होती. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर या चारही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही, त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे.प्राथमिक तपासात दारुच्या नशेत बॉम्ब असल्याचा कॉल काही तरुणांनी केल्याचे निष्पन्न झाले असून, कल्याणमध्ये राहणाऱ्या या तिन्ही तरुणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर या तिघांना पोलिसांनी अटक केली. राजू कांगणे, रमेश शिरसाटसह अन्य एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांंना कोठडीची हवा खावी लागत असल्याने त्यांनी असे कॉल करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.दिवसाला हजारो कॉल...मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दिवसाला हजारो कॉल येतात. यात कुठे मदतीसाठी तर कुठे विविध माहितीच्या चौकशीसाठी कॉल येत आहेत. यात वाहतूक कोंडीबाबतच्या कॉलचे प्रमाणही अधिक आहेत. अशात, कोरोना संबंधित उपचार, लसीकरणाबाबतच्या चौकशीचे कॉलही नियंत्रण कक्षात सुरू आहेत, तसेच विविध मदतीसाठीचे कॉल सतत सुरू असतात. संबंधित कॉलधारकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलीस नियंत्रण कक्षातही येतात बनावट कॉल; होते तत्काळ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 9:52 AM