पावणेआठ लाख रुपये देऊन हाती बनावट हिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 02:31 PM2023-04-24T14:31:44+5:302023-04-24T14:32:09+5:30
व्यावसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑपेरा हाऊसमधील हिरे व्यावसायिकाकडून पावणेआठ लाख रुपये उकळून त्याच्या हाती बनावट हिरा दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी डॉ. दा.भ. मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार ४५ वर्षीय हिरे व्यापारी यांचा ऑपेरा हाउसमध्ये दुकान आहे. या प्रकरणी नागरपूरच्या अमरचंद नायक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १५ मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत २२ एप्रिलदरम्यान ही फसवणूक झाली. आरोपीने त्यांच्या दुकानात येत त्यांना १.५ कॅरेटचा नॅचरल हिरा असल्याचे सांगून कमी किमतीत विक्री करणार असल्याचे सांगितले. हिऱ्याचे बनावट जीआयए प्रमाणपत्र दाखवून विश्वास संपादन केला.
ठरल्याप्रमाणे आरोपीला सात लाख ८३ हजार रुपये दिले. पुढे तपासणीत आरोपीने दिलेला हिरा बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार डॉ. दा.भ. मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपीने अशाचप्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय आहे. त्यानुसार, पोलिस अधिक तपास करीत आहेत.