आदिवासींच्या रकमेवर उच्च शिक्षितांचा डोळा, अपघात नुकसानभरपाईसाठी दाखल केली बनावट कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:25 AM2017-10-07T02:25:45+5:302017-10-07T02:26:05+5:30
अदिवासी प्रवाशांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत उच्चशिक्षित आपली गुणवत्ता खर्ची घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : अदिवासी प्रवाशांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत उच्चशिक्षित आपली गुणवत्ता खर्ची घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एसटीच्या मार्च २०१६मध्ये झालेल्या अपघातात १ कोटी १६ लाख ७५ हजार रुपयांची, सप्टेंबर महिन्यातील अपघातांसाठी ८ लाखांची नुकसानभरपाईची मागणी केली होती. बनावट डिस्चार्ज कार्ड आणि अपंगत्व प्रमाणपत्रद्वारे ही मागणी केली होती. एसटीचे सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी याबाबत चौकशी केली असता, बनावट कागदपत्रांच्या आधारे नुकसानभरपाईचा आकडा फुगवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाने ठाणे शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यात डॉक्टर आणि वकिलांचा समावेश आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अपघातात जखमी आणि मृतांना नुकसानभरपाई दिली जाते. २५ हजारांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. २३ मार्च २०१६ रोजी शहापूर आगाराची शहापूर-जुनवली ही बस मुरबीचा पाडा येथे अपघातग्रस्त झाली. यात एका प्रवाशाचा मृत्यू तर ३० जखमी झाले. यापैकी २७ जखमी प्रवाशांनी मोटार अपघात न्याय प्राधिकरण विभागात नुकसानभरपाई म्हणून १ कोटी १६ लाख ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या दाव्यासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड आणि घाटकोपर येथील शांतिनिकेतन खाजगी रुग्णालयाचे अपंगत्व प्रमाणपत्र जोडण्यात आले होते.
दाव्याबाबत संशय आल्यामुळे ठाणे विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकारी अविनाश पाटील यांनी चौकशी केली असता, सिव्हिल रुग्णालयात १३ प्रवाशांना २ दिवस उपचार करून घरी पाठवले होते. शिवाय दाव्यातील डिस्चार्ज कार्ड रुग्णालयाने दिलेले नसल्याचे समोर आले. तर खासगी रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्र दिलेला डॉक्टर रुग्णालयात नोकरीला नसल्याचे समोर आले आहे. प्रमाणपत्रावरील शिक्का हा रुग्णालयाचा असला तरी तो शिक्का बनावट असल्याचे खासगी रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कुंदे ते भिवंडी मार्गावर १२ सप्टेंबर रोजी एसटीचा अपघात झाला होता. यात ८ प्रवाशांनी ८ लाख रुपयांची मागणी केली होती. या वेळीदेखील पुरावा म्हणून सिव्हिल रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड सादर करण्यात आले होते. मात्र जखमी प्रवाशांनी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात कोणतेही उपचार घेतले नसल्याचे एसटीने केलेल्या चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी महामंडळाकडून वकील यू.आर. विश्वकर्मा आणि डॉ. मिहिर अविनाश रनावरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती एसटीचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी
दिली.
दोन्ही दावे यू.आर. विश्वकर्मा (वकील) यांनी दाखल केले आहेत. तर अपंगत्व प्रमाणपत्र डॉ. मिहिर अविनाश रनावरे यांनी दिले आहे. अदिवासी जखमी प्रवाशांना ७० ते ८० हजार देतो, असे सांगून डाव्या हाताचा अंगठा आणि सह्या घेत कागदपत्रे बनवण्यात आली. अदिवासी प्रवाशांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत हा बनाव रचण्यात आल्याचे दिसून येत आहे.
९ दावे मागे घेतल्यामुळे संशय दाट
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अपघात नुकसानभरपाईबाबत चौकशी करत असल्याची माहिती मिळताच एसटीविरोधातील संबंधित वकिलांकडून ९ दावे मागे घेण्यात आले आहेत. या दाव्यांमध्ये लाखो रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. परिणामी, हे दावे बनावट असल्याचा संशय एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.