गेल्या काही काळापासून सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून किंवा बनावट अकाऊंट बनवून त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दरम्यान, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचंच बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्याद्वारे नांगरे-पाटील यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर पोस्ट शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले की, नमस्कार मित्रांनो काही फ्रॉड मंडळींनी माझ्या नावाने एक बनावट अकाऊंट उघडलं आहे. त्याद्वारे ते माझ्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज पाठवत आहेत. त्यांना प्रतिसाद देऊ नका, तसेच कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नका, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईच्या सायबर पोलीस टीमने तातडीने कारवाई करून हे बनावट अकाऊंट बंद केलं आहे. त्यानंतर नांगरे पाटील यांनी सायबर पोलिसांचे आभार मानले आहेत.