मुंबई: गेल्या चार ते पाच वर्षात शेकडो हॉटेल्स, मेडिकल, किराणा शॉपना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)चे अधिकारी असल्याचे सांगत दंडाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या दुकलीला कस्तुरबा पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. यातील मास्टरमाईंड प्राधीकरणाच्या माजी अधिकाऱ्याचे नाव वापरत हा गुन्हा करत असताना तक्रारदार हॉटेल व्यापाऱ्याने बनावट अधिकाऱ्याला ओळखले आणि ही फसवणूक उघडकीस आली. या दोघांना अवघ्या सहा तासात कस्तुरबा पोलिसांनी अटक केले आहे.
वर्धन रमेश साळुंखे उर्फ अविनाश गायकवाड (२८) आणि धर्मेश शिंदे (२५) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे आहेत. यात साळुंखे हा १० वी नापास तर त्याचा सहकारी शिंदे हा बारावी शिकलेला असुन दोघे कांदिवली पूर्व परिसरात राहतात.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी ही दुकली बोरिवली पूर्वच्या राजेंद्र नगर याठिकाणी असलेल्या सेंट्रल प्रभू हॉटेलचे तेजस हेगडे आणि आरोही हॉटेल मॅनेजर तंगमनी केरमडा यांच्याकडून चार ते पाच हजार रुपये उकळले. मात्र तिसऱ्या ठिकाणी गेल्यावर साळुंखे हा गाडीत बसून होता तर शिंदे याने जाऊन साहेब बाहेर बसले आहेत असे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर व्यक्ती साहेबाला भेटायला बाहेर आला.
मात्र सदर व्यक्ती हा अधिकारी नसून भामटा असल्याचे लक्षात आले आणि आरोपीने तिथून पळ काढला. याची माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निरिक्षक अनिल आव्हाड यांना मिळाली आणि त्यांनी पोलीस निरीक्षक नितीन तडाखे, जगदाळे, , सहायक पोलीस निरीक्षक ओम तोटावर यांच्या नेतृत्वाखाली तीन ते चार पथके नेमत शिंदे आणि साळुंखे यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, एफडीएशी संबंधित फॉर्म, त्यांनी हफ्ता वसुली केल्याची नोंद केलेल्या दोन वह्या व महाराष्ट्र शासन लिहिलेली नेम प्लेट ताब्यात घेतली. आरोपी ड्रायफ्रुट, मेडिकल, हॉटेल्स, किराणा अन्य दुकानात हे अस्वच्छता, धूम्रपान सारख्या गोष्टींची पडताळणी करत त्यानुसार दंडाची रक्कम सांगायचे. तेव्हा आस्थापनाचे चालक मालक हे घाबरून मांडवली करत चार ते पाच हजारात विषय मिटवायचे. तसेच त्यांची कोणी तक्रारही न केल्याने अद्याप ७० ते ८० जणांना यांनी गंडा घातला असावा अशी शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांनी अंधेरी ते दहिसर परिसरात हे प्रकार केल्याचे त्यांच्या नोंदवहीत उल्लेख करण्यात आला आहे.
आहारकडून पोलिसांचा सत्कार
फसवणुकीचा हा प्रकार उघड करणाऱ्या आव्हाड आणि त्यांच्या पथकाचा आहार संघटनेकडून सत्कार करण्यात आला. तर व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे फसू नये असे आवाहन परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले.
नॉट गीव्हन आणि स्मोकिंग बीडी
आरोपींच्या वहीत त्यांनी फसवलेल्या लोकांचे बिझनेस कार्ड चिकटवून त्यापुढे त्यांचा रिमार्क हे दोघे लिहायचे. ज्यात पैसे न दिल्यास नॉट गिव्हन आणि दंड आकारल्याचे कारण स्मोकींग बिडी असे देखील लिहिल्याचे सापडले आहे.