मुंबई : कमी किमतीमध्ये सोने देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी दीड किलो बनावट सोने हस्तगत केले. यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चुनाभट्टी येथे राहणारे शाहीद शेख यांना १५ दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाने फोन केला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटे असून ती कमी किमतीमध्ये विकायची असल्याचे त्याने शेख यांना सांगितले. त्यानुसार २० सप्टेंबरला आरोपी आणि शेख हे सायन परिसरात भेटले. आरोपींनी शेख यांना काही सोन्याची बिस्किटे दाखवल्यानंतर त्यांनी आरोपींना २५ हजार रुपये अनामत रक्कम दिली. मात्र त्यानंतर तीन दिवस शेख यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपींचा फोन बंद लागत होता. आपली फसवणूक झाल्याचे शेख यांना समजताच त्यांनी याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र दुसऱ्याच दिवशी आरोपींनी पुन्हा शेख यांना फोन करुन ठरलेली रक्कम घेऊन येण्यास सांगितली. शेख यांनी तत्काळ ही बाब चुनाभट्टी पोलिसांना कळवली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गालिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल बागडे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री सायन परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दोन्ही आरोपी एका हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी झडप घालून त्यांना अटक केली. जावेद शेख (३१) आणि इस्माईल कुरेशी (२३) अशी या आरोपींची नावे असून दोघेही राजस्थान येथील आहेत.
बनावट सोने विकणारे अटकेत
By admin | Published: September 29, 2015 12:43 AM