मुंबई- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते गेल्या काही दिवसांपासून यावरुन टीका करत आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?, असा सवाल उपस्थित करत जमीनदोस्त करा हे थडगं... म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा निशाणा साधला आहे.
नवीन मदरशांना अनुदान मिळणार नाही, असा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. भोंगे उतरले ,रस्त्यावरील नमाज बंद झाले, मदरशांमध्ये राष्ट्रगीत सुरू झाले, असं म्हणत गजानन काळे यांनी योगी सरकारचे कौतुक केले आहे. आमच्याकडे हे नकली हिंदुत्ववादी औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण पुरवत आहे, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. तसेच टोमण्यातून बाहेर या, कृती करा, असा टोला देखील गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं.
'...त्यांनी इथे येऊन राजकारण करु नये'- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आता सदर प्रकरणाचा निषेध केला आहे. एखादा राजकारणी बाहेरून येऊन औरंगजेबच्या समाधीला जातो या गोष्टीचा मी निषेध करतो, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात कुठेतरी जातीपातीचे राजकारण होत असून त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही त्याने इथे येऊन राजकारण करू नये, अशा शब्दात शरद पवारांनी ओवेसींना ठणकावले आहे.