‘एचएसआरपी’ नोंदणीसाठी बनावट लिंक; पोलिसांत तक्रार, सायबर भामट्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 05:34 IST2025-03-07T05:33:58+5:302025-03-07T05:34:55+5:30
वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे.

‘एचएसआरपी’ नोंदणीसाठी बनावट लिंक; पोलिसांत तक्रार, सायबर भामट्यावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक परिवहन आयुक्त गजानन ठोंबरे यांच्या तक्रारीनुसार, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारा फेरफार आणि बनावटीकरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे.
३० एप्रिलची अंतिम मुदत
आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपूर्वी एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन संस्थांची नेमणूक केली आहे. प्लेट बसविण्याचे काम महाराष्ट्रात सुरू झाले आहे. एचएसआरपी बसविण्यासाठी वाहन मालकांना आरटीओच्या वेबसाइटवरील संबंधित टॅबमध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
या कंपन्यांना काम
मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड (झोन-१), मे. रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड (झोन-२) आणि मे. एफ.टी.ए. एवएसआरपी सोल्युशन्स लिमिटेड (झोन-३) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी झोन १ आणि २ कडून मिळालेल्या मेलमध्ये सायबर ठगांनी प्लेट बसविण्यासाठी सहा बनावट लिंक तयार करून त्या शेअर केल्याची माहिती मिळाली. भामटे वाहन मालकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच परिवहन विभागाने बुधवारी पोलिसांत तक्रार दिली.
बनावट संकेतस्थळांबद्दल आमच्याकडे बऱ्याच तक्रारी येत होत्या. त्याबद्दल पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. सध्या अशी सहा संकेतस्थळे निदर्शनास आली असून त्याबाबत जागृतीसाठी माध्यमांमध्ये माहिती देणार आहोत. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त