महिला संशोधकाची गिफ्ट कार्ड पाठविण्याच्या नावाखाली फसवणूक
महिला संशोधकाची गिफ्ट कार्ड पाठविण्याच्या नावाखाली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थानच्या (आयसीएमआर) संचालिकेच्या बनावट मेलद्वारे संशोधकांना ॲमेझाॅन गिफ्ट कार्डस खरेदी करण्याचे मेल धाडले. यातच एका ३३ वर्षीय संशोधक महिलेची सव्वा लाखाला फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या आयसीएमआरमध्ये संशोधक म्हणून नोकरी करतात. त्यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थेच्या संचालिका गीतांजली सचदेवा यांच्या नावाने ६ एप्रिल रोजी सकाळी मेल आला.
त्यात मदत हवी असल्याचे सांगण्यात आले.
संचालिकेचा मेल आल्याचे समजून तत्काळ प्रतिसाद देत काय मदत हवी याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांचे डेबिट कार्ड चालत नसून त्यांना प्रत्येकी १० हजार किमतीची ३ ॲमेझाॅन गिफ्ट कार्ड खरेदी करावयाची असून, खरेदी केलेली गिफ्ट कार्डस ही त्यांनी पाठविलेल्या ई-मेल आयडीवर पाठविण्याबाबत सांगितले. पुढे तसेच गिफ्ट कार्ड खरेदी करून संबंधित ई-मेल आयडीवर पाठविले.
पुढे आणखी ५ कार्ड खरेदी करण्यास सांगताच तेही खरेदी करत त्यांना पाठविले. अशा प्रकारे एकूण ११ ॲमेझाॅन गिफ्ट कार्डस खरेदी करून पाठविले.
पुढे सचदेवा यांनी त्यांच्या नावाने संस्थेमधील संशोधकांना ई-मेल पाठविण्यात येत असून हे ई-मेल त्यांनी पाठविलेले नसल्याबाबतचा संदेश पाठवताच
त्यांना धक्का बसला. आणि घडलेला प्रकार वरिष्ठांना सांगून भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यात त्यांची एक लाख दहा हजार रुपयांना फसवणूक झाली आहे.