‘त्या’ बनावट संशोधन संस्थेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:28 AM2019-03-08T05:28:06+5:302019-03-08T05:28:13+5:30
शासन आणि प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत ठगांनी स्थापन केलेल्या ‘श्री अरविंदो इन्स्टिट्यूट आॅफ अप्लाईड सायंटिफिक रिसर्च सेंटर’ या बनावट संशोधन संस्थेचा तपास शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
मुंबई : शासन आणि प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत ठगांनी स्थापन केलेल्या ‘श्री अरविंदो इन्स्टिट्यूट आॅफ अप्लाईड सायंटिफिक रिसर्च सेंटर’ या बनावट संशोधन संस्थेचा तपास शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
संशोधनाच्या नावाखाली या संस्थेने गेल्या चार वर्षांत तब्बल १९४ कोटी रुपयांची उलाढाल केली. त्याचे विवरणपत्रच आयकर विभागाला सादर करत त्यांनी आयकरात सूट देण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अंधेरीतील रहिवासी असलेल्या उमेष नागडा (५५) याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने ही संस्था स्थापन केली आहे. अंधेरीत कार्यालय आहे असे सांगून शैक्षणिक संस्था तसेच लोकांकडून देणग्या गोळा केल्या. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे स्वीकारलेल्या देणग्या प्रत्येक वर्षात वेगवेगळ्या बँक खात्यांत जमा झाल्या आहेत. यात, सुरुवातीला २०१३ ते २०१४ पर्यंत आयसीआयसीआय बँकेतील खात्यात देणग्या जमा झाल्या.
२०१४-१५ मध्ये आयसीआयसीआय बँकेसह, पंजाब नॅशनल बँक, इंड्सइंड बँक, इंडियन बँकेतील खात्यांची भर पडली. त्यापाठोपाठ २०१५-१६ मध्ये पंजाब नॅशनल बँकसह इंडियन बँक, अॅक्सिस, इंड्सइंड या बँकेतून व्यवहार केले. २०१६ नंतर देणग्यांमध्ये वाढ झाली. २०१६ - १७ मध्ये याच बँक खात्यांत तब्बल १७ वेळा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले.
मात्र, आता मिनिस्ट्री आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी डिपार्टमेंट आॅफ सायंटिफिक रिसर्चच्या टेक्नोलॉजी भवनाकडून अशी संस्था अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार संस्थेचा संस्थापक उमेष नागडा (५५) ही व्यक्ती तरी खरी आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. संस्थेच्या संस्थापकांसह संबंधित बँकांकडेही चौकशी करण्यात येणार आहे.
>मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
बँक खाती कुठल्या कागदपत्रांच्या आधारे उघडली, या देणग्या कुठून व कशा जमा झाल्या; तसेच संस्थेच्या संस्थापकासह संस्थेचा दिलेला पत्ता खरा आहे का, आदींचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करेल. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.