झोपु योजनेसाठी खोट्या सह्या, खोटी कागदपत्रे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 09:56 PM2024-02-08T21:56:43+5:302024-02-08T21:57:16+5:30
वडाळ्यातील गणेशनगर बचाव संघर्ष समितीचा आरोप
श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशनगर झोपडपट्टीचा झोपु योजनेत विकास करण्यासाठी झोपडीधारकांच्या खोट्या सह्या आणि कागदपत्रे घेऊन एसआरए कार्यालयात प्रस्ताव दाखल केल्याचा आरोप वडाळ्यातील गणेशनगर बचाव संघर्ष समितीने केला आहे.
एसआरएने ताबडतोब हा प्रस्ताव फेटाळावा अन्यथा एस.आर.ए.च्या कार्यालयासमोर झोपडीधारकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघर्ष समितीने दिला आहे. वडाला गणेशनगर बचाव संघर्ष समितीचे प्रमोद सावंत, शंकर म्हात्रे, देविदास पाजणे,गणेश पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी परिषदेत हे आरोप केले.
या अगोदर लकडावाला यांनी २००० मध्ये गणेशनगर झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. परंतु १० ते ११ वर्षे त्यांनी काहीच काम न केल्यामुळे एसआरएकडून त्यांना काढून टाकण्यात आले होते. त्याचबरोबर वडाळ्याच्या आसपासाच्या सोसायटीमधून एसआरएने स्वतः लकडावालाला काढून टाकले आहे. तसेच मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्या ठिकाणी झोपडिधाराकांची फसवणूकच केलेली असून त्यांच्यावर दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. अश्या बिल्डरचा प्रस्ताव एसआरएने स्वीकारलाच कसा ? या असा सवाल गणेशनगर बचाव संघर्ष समितीचा आहे.