Join us

बनावट तृतीयपंथीय ‘प्राची’चा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:07 AM

मुंबई : बोरीवली पश्चिम परिसरात बुधवारी रात्री प्रदीप दत्तात्रय चोपडे (३०) नामक व्यक्तीवर दोघांनी हल्ला चढवत त्याची हत्या केली. ...

मुंबई : बोरीवली पश्चिम परिसरात बुधवारी रात्री प्रदीप दत्तात्रय चोपडे (३०) नामक व्यक्तीवर दोघांनी हल्ला चढवत त्याची हत्या केली. ही व्यक्ती तृतीयपंथी नसूनही ‘प्राची’ या नावाने सिग्नलवर पैसे मागत असल्याने त्या रागात त्याची हत्या करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे असून, पुन्हा उघडपणे जीवघेणा हल्ला प्रकरणात परिमंडळ ११ चर्चेत आले आहे.

प्रदीप दत्तात्रय चोपडे हा भाईंदरचा राहणारा होता. तसेच तो खरा तृतीयपंथी नव्हता. मात्र असे असूनही तो तृतीयपंथी पायल शिंदे आणि तिचा साथीदार नरेश थापा यांच्या परिसरात तसेच सिग्नलवर येऊन पैसे मागायचा. ही बाब स्थानिक तृतीयपंथीयांना खटकत होती. त्यावरून शिंदे आणि चोपडे यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी रात्रीदेखील यावरून झालेल्या वादात पायलने चोपडेवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर थापानेही पायलला साथ दिली. या हल्ल्यात चोपडे गंभीर जखमी झाला. या प्रकाराची माहिती मिळताच एमएचबी पोलीस आणि परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत चोपडेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी थापा आणि पायल या दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून उघडपणे असे हल्ले परिमंडळ ११ मध्ये होत आहेत. ज्यात पुन्हा या हत्येची भर पडली असून, पोलीस उपायुक्तांचे त्यांच्या विभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचे उघड झाले आहे.