संजय गांधी उद्यानाच्या नावे बनावट वेबसाइट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:44 AM2019-11-07T00:44:02+5:302019-11-07T00:44:12+5:30
फसवणुकीची तक्रार दाखल : एकाला १५ हजार ३३० रुपयांना गंडविले
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी, पर्यटकांच्या सोईसाठी वनविभागाची अधिकृत वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे. एका आरोपीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नावे बनावट वेबसाइट तयार करून शैलेंद्र मिश्रा यांची १५ हजार ३३० रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी कुलाबा पोलीस ठाणे, कस्तुरबा पोलीस ठाणे आणि वनविभागाकडे लेखी तक्रार नोंदविली आहे.
उद्यानाच्या अधिकृत वेबसाइटवर उद्यानाबाबतची व उद्यानामध्ये कार्यान्वित असलेली प्रेक्षणीय स्थळे, प्रेक्षणीय स्थळाला भेटी देणाऱ्या पर्यटकांकडून प्रत्येक मनोरंजनाच्या ठिकाणचे शुल्क इत्यादी माहिती अपलोड केलेली असते. मिश्रा यांनी आॅनलाइन तिकीट बुकिंगसाठी बनावट वेबसाइटवर जाऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनस्थळाची माहिती घेतली. यावेळी मिश्रा यांनी संकेतस्थळावरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चौकशी केली असता, त्यांच्या बँकेच्या खात्यातून आॅनलाइन पद्धतीने १५ हजार ३३० रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली़