१२५ फेक वेबसाईट : एलपीजी गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली १०,५०० जणांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेगवेगळ्या बनावट संकेतस्थळावरून जाहिरातीद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अशाच दोन संकेतस्थळावरून एलपीजी गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली देशभरातील १०,५२१ जणांना १० कोटी १३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाजणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी अशाच एका संकेतस्थळावरील जाहिरातीला भुलून एका तक्रारदाराने तीन लाख ६६ हजार रुपये गमावले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रमोद खोपीकर, रवी नाळे, अमित उतेकर, गणेश शिर्के, राहुल खेत्रे, मधुबाला लावंड यांनी सुरू केलेल्या तपासात दोन बनावट संकेतस्थळ मिळून आले. यावरून देशभरातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे आमीष दाखवून बिहार आणि पश्चिम बंगालमधून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार दोन पथके बिहार, एक पथक पश्चिम बंगाल, तर एक पथक रत्नागिरीला रवाना झाले.
तांत्रिक तपासाच्या आधारे बँक खातेधारक आणि लाभार्थी अशा तिघांना बिहारमधून अटक केली. याबाबत समजताच रत्नागिरीतील आरोपीने पळ काढला. त्याचा पाठलाग करत जसगडमधून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून वेबसाईट तयार करणाऱ्या दोन अभियंत्यांना पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून अटक केली. ही टोळी फेक वेबसाईट बनवून त्यावर विविध प्रकारच्या जाहिराती देतात. लोकांनी जाहिरातीवर क्लिक करताच हुबेहूब दिसणाऱ्या जाहिरातीमुळे लोक ठगांच्या जाळ्यात अडकायचे. नोंदणी केल्यानंतर आरोपी बनावट ईमेलद्वारे कागदपत्रे पाठवत असत. त्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी यात पैसे भरले. अशाप्रकारे आरोपींनी दोन वेबसाईटद्वारे देशातील १०,५२१ नागरिकांची फसवणूक केली आहे. बिहार पटनामधून ही टोळी कार्यरत होती.
....
१२३ फेक वेबसाईट ॲक्टिव्ह
आरोपींनी उर्वरित १२३ वेबसाईटवरून कर्ज देण्याच्या बहाण्याने बजाज फिनसर्व्ह, बजाज इंस्टंट लोन, पेट्रोल पंप डीलरशिप, स्नॅपडील, नापतोल, रिलायन्स टॉवर यांच्या नावाखाली फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
....
तुमचीही फसवणूक झाली आहे का?
तुमचीही अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
....