Join us

बँकांचे व्याजदर घटल्याने सणासुदीच्या काळात घर विक्रीला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:06 AM

मुंबई : देशात महत्त्वाच्या बँकांनी सणासुदीच्या काळात कमी व्याजदरावर कर्ज देऊ केले आहे. येत्या काळात गृहकर्जांची मागणी वाढण्याची चिन्हे ...

मुंबई : देशात महत्त्वाच्या बँकांनी सणासुदीच्या काळात कमी व्याजदरावर कर्ज देऊ केले आहे. येत्या काळात गृहकर्जांची मागणी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. घर विक्रीलादेखील चालना मिळू शकणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्ज घेणाऱ्यांना कर्जाच्या रकमेची अट न ठेवता त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित ६.७० टक्के व्याज आकारणार आहे.

कर्जदारांच्या व्यवसायाचा विचार न करता सर्व प्रकारच्या कर्जदारांसाठी ही ऑफर उपलब्ध आहे. ६.७० टक्के गृहकर्जाची ऑफर शिलकीच्या कर्ज हस्तांतरण प्रकरणांसाठीदेखील लागू आहे, कोटक महिंद्रा बँकेने आपल्या गृह कर्जाचे व्याज दर १५ बीपीएसने कमी करीत ६.६५ टक्क्यांवरुन वार्षिक ६.५० टक्के केले आहेत. ८ नोव्हेंबर २०२१पर्यंत ही ऑफर असणार आहे, बँक ऑफ बडोदाने गृह आणि वाहन कर्जासाठी सध्या लागू असलेल्या दरांमध्ये ०.२५ टक्क्यांची सवलत दिली आहे.

त्या व्यतिरिक्त, बँक गृह कर्जामध्ये प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता गृह कर्जाचे दर ६.७५ टक्के व वाहन कर्जाचे दर ७ टक्क्यांपासून सुरू होतील, पंजाब नॅशनल बँकेने रेपो-आधारित कर्ज दर २५ बीपीएसने कमी करून ६.५५ टक्के केले आहे, एचडीएफसीनेही ६.७० टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या गृहकर्जासह फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली. कर्जाच्या स्लॅबसाठी आणि ८०० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या सर्व ग्राहकांसाठी ऑफर आहे.

वेदांशु केडिया - संचालक, प्रेसकॉन ग्रुप : कमी व्याजदर हे बांधकाम क्षेत्रासाठी उत्साहवर्धक ठरतील. नामांकित बँकांकडून कमी व्याज दर हे देशातील आर्थिक वाढीस उपयुक्त ठरतील. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याची उत्तम संधी प्राप्त होईल.

चेराग रामकृष्णन, व्यवस्थापकीय संचालक, सीआर रियल्टी - सणासुदीचा शुभ काळ लक्षात घेता, अग्रगण्य बँकांनी व्याजदर कमी करण्याची यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. रिअल इस्टेट बाजारात यावर्षी चांगली विक्री झाली आहे आणि या कमी व्याजदरामुळे विक्रीची गती कायम ठेवण्यास मदत होईल.