- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवरील व्यवसाय, उद्योगांची गणिते बदलली आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांबरोबर ‘सीए’च्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कामकाजात बदल झाले आहेत. जागतिक पातळीवरचा बदल लक्षात घेऊन ‘दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया’ने (आयसीएआय) ‘सीए’च्या अभ्यासक्रमात आणि परीक्षा पद्धतीत बदल केला असून परीक्षेची काठिण्य पातळी वाढवण्यात आली आहे. १ जुलैपासून हे बदल करण्यात येणार असल्याची माहिती आयसीएसआयचे उपाध्यक्ष मंगेश किनरे यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत फक्त परीक्षा देऊन बघू म्हणून ‘सीए’च्या अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट (सीपीटी) देत असल्याचे आढळून आले आहे. गांभीर्याने, विचारपूर्वक सीपीटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. तसेच सीपीटी परीक्षा सोपी असल्यामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होत असत. पण पुढे ही मुले गांभीर्याने अभ्यास करत नसल्यामुळे त्याचा परिणाम ‘सीए’च्या निकालावर होताना दिसत आहे. बदललेल्या अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमुळे ‘सीए’च्या प्रोफेशनमध्ये नक्कीच बदल दिसून येणार असल्याचे किनरे यांनी स्पष्ट केले. प्रवेश परीक्षेतील चार पेपरपैकी दोन पेपर हे आॅब्जेक्टिव्हवरून दीर्घोत्तरी करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या परीक्षेतच विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य आणि सादरीकरण कौशल्याची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याची तपासणी करण्यासाठी ‘बिझनेस करस्पॉण्डन्स अॅण्ड रिपोर्टिंग’ आणि ‘बिझनेस अॅण्ड कमर्शिअल नॉलेज’ या दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २०० गुणांची सीपीटी परीक्षा आता ४०० गुणांची होणार आहे. यामध्ये २०० गुणांचे आॅब्जेक्टिव्ह प्रश्न आणि २०० गुणांचे दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘इंटरमिजिएट लेव्हल’वर देखील अभ्यासक्रमात आणि परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. या लेव्हलवर एक १०० गुणांचा पेपर हा ‘कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग’ या विषयाचा असणार आहे. तर ‘फायनान्शियल मॅनेजमेंट अॅण्ड इकॉनॉमिक्स फॉर फायनान्स’ (१०० गुण) हा नवीन विषय असणार आहे. फायनल लेव्हलला ७ विषयांच्या पेपर बरोबरीने एक ‘इलेक्टिव्ह विषया’च्या पेपरचा समावेश करण्यात आला आहे. १ जुलैपूर्वी ‘सीए’साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुनी सीपीटी परीक्षा डिसेंबर २०१९ पर्यंत देता येणार आहे. हे विद्यार्थी डिसेंबर २०१७, जून २०१८, डिसेंबर २०१८ अणि जून २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये जुन्या सीपीटी परीक्षेसाठी बसू शकणार आहेत. जुन्या सीपीटी पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असल्यास यंदा दहावी, अकरावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही १ जुलैपूर्वी नावनोंदणी करू शकतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा द्यावी लागणार नाही, असे किनरे यांनी स्पष्ट केले.ओपन बुक टेस्टअंतिम परीक्षेत ग्रुप दोनमधील पेपर क्रमांक सहा हा विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्टिव्ह पेपर’ असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विषय निवडीसाठी सहा विषय देण्यात आले आहेत. त्यापैकी एक विषय निवडल्यावर या विषयाच्या परीक्षेला पुस्तक घेऊन परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.चार आठवड्यांचा अभ्यासक्रम‘ओरिएन्टेशन कोर्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयाऐवजी आता ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅण्ड सॉफ्ट स्किल्स’चा अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम चार आठवड्यांचा आहे. यात दोन आठवडे सॉफ्ट स्किल्ससाठी आणि दोन आठवडे आयटीसाठी देण्यात आले आहेत. प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी तीन वर्षांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. चार आठवड्यांचा ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅण्ड सॉफ्ट स्किल्स’ (एआयसीआयटीएसएस) चा समावेश करण्यात आला आहे.