Join us

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

By admin | Published: February 04, 2016 4:22 AM

सकाळच्या सुमारास लोकल गाड्यांना असलेली प्रचंड गर्दी, या गर्दीतही लोकल पकडण्यासाठी तरुणांची होत असलेली अतिघाई सध्या अपघातांना निमंत्रण देत आहे

मुंबई : सकाळच्या सुमारास लोकल गाड्यांना असलेली प्रचंड गर्दी, या गर्दीतही लोकल पकडण्यासाठी तरुणांची होत असलेली अतिघाई सध्या अपघातांना निमंत्रण देत आहे. गर्दीवर रेल्वे प्रशासनालाही तोडगा काढता न आल्याचे, बुधवारी घडलेल्या घटनेनंतर समोर आले आहे. बुधवारी गर्दीमुळे एका अठरा वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मानखुर्द ते गोवंडीदरम्यान घडली. यात आणखी दोन प्रवासी जखमी झाले असून,ते अनुक्रमे २१ आणि २४ वर्षाचे आहेत. मानखुर्दचे रहिवासी असलेल्या नीलेश जैयस्वाल (१८), सुमित बोबाटे (२१) आणि फुलचंद मौर्य (२४) या तिघांनीही मानखुर्द स्थानकातून सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सीएसटीला जाणारी लोकल पकडली. गर्दी असल्याकारणाने हे तिघेही दरवाजाजवळ लटकून प्रवास करत होते. डब्यात प्रवेश करण्यासाठी तिघांचीही धडपड सुरू होती. मात्र, लटकून प्रवास करत असतानाच मानखुर्द ते गोवंडीदरम्यान अवघ्या काही मिनिटांतच तिघांचाही तोल गेला आणि लोकलमधून पडताच त्यांना जबर मार लागला. तिघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर, यातील नीलेश जैयस्वाल याच्या डोक्याला मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर फुलचंद हा गंभीर जखमी असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. सुमित बोबाटेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. याबाबत वाशी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एम. बोबडे म्हणाले, ‘गर्दीमुळे या तिघांचे अशाप्रकारे अपघात झाले.’ (प्रतिनिधी)