परदेशात नोकरीच्या आमिषाने घातला गंडा, अनेकांची कोट्यवधींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:09 AM2017-09-19T02:09:40+5:302017-09-19T02:09:43+5:30
परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक करणा-या एका टोळीचा पदार्फाश अंधेरी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांनी सव्वा कोटीहून अधिक रक्कम लुबाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक करणा-या एका टोळीचा पदार्फाश अंधेरी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांनी सव्वा कोटीहून अधिक रक्कम लुबाडल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित पाटोळे उर्फ नवीन जोशी (३९), अमरदीप चौहान उर्फ हरीश राठोड (२८), सर्फराज शेख उर्फ आसिफ (४३) व अब्दुल अन्सारी उर्फ मेहंदी हसन जाफर रझा उर्फ राज (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी मुंबईसह नवी मुंबई, उत्तर प्रदेशातही फसवणूक केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
चौघांनी गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये ओरबीस इंटरनॅशनल या नावाने एक कार्यालय उघडले होते. ते विदेशात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक करत होते. त्याबाबतची माहिती अंधेरी पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस
निरीक्षक पंडित थोरात, निरीक्षक राजेश पाडवी आणि पथकाने चौघांना अटक केली.
उच्चभ्रू इमारतीमध्ये कॉर्पोरेट आॅफिसेस भाडेतत्वावर घ्यायची. परदेशात नोकरीच्या जाहिराती देऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचे. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवून घ्यायचे, व्हिसा, तिकीट, तसेच राहण्या-खाण्यापिण्याची सोय करण्याचा खर्च सांगत वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात पैसे जमा करून घ्यायचे आणि त्यानंतर गाशा गुंडाळून पळ काढायचा अशी त्यांची कार्यपद्धती होती.