मुंबई : पैसे उकळण्यासाठी किंवा एखाद्याला फसविण्याकरिता महिलांसाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक प्रकार अंबोली परिसरात घडला आहे. यात एका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून या प्रकरणी त्यांनी न्यायालयात या महिलेविरोधात कारवाई करण्याबाबत अर्ज दिल्याचे समजते.विकासकाच्या दोन मुलांनी अंबोलीमधून पाठलाग करत गोरेगावमध्ये विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने ३ मे रोजी केली होती. नंतर अंबोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. याचा तपास अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक करत होते.या महिलेने यात एक प्रत्यक्षदर्शीदेखील पोलिसांना दिला होता. त्यानुसार नायक यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही पडताळून पाहिले. तसेच महिला आणि संशयीत आरोपींचे मोबाइल लोकेशनदेखील तपासले. यात ही महिला ज्या वेळी तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचे सांगत होती; त्या वेळी तिचे आणि संशयितांचे मोबाइल लोकेशन फार दूरचे दाखवत होते. सीसीटीव्हीमध्येदेखील ते दोघे त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे उघड झाले. त्यातच फेब्रुवारी महिन्यातदेखील या महिलेने अशाच प्रकारे तक्रार दाखल केल्याचे नायक यांना समजले. त्यानुसार याबाबतचा अहवाल अंबोली पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला. न्यायालयाने निर्देश दिल्यास खोटी तक्रारदेणाऱ्या महिलेविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
अंबोली पोलिसात विनयभंगाची खोटी तक्रार, कारवाई करण्याबाबत पोलिसांचा न्यायालयात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:25 AM