घरे देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: February 18, 2015 12:54 AM2015-02-18T00:54:13+5:302015-02-18T00:54:13+5:30
खारघर येथे इमारतीमध्ये स्वस्तात घरे देण्याचे सांगून ८० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबई : खारघर येथे इमारतीमध्ये स्वस्तात घरे देण्याचे सांगून ८० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. जुलै २०१२ पासून या ठिकाणी १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेसर्स देव इंटरप्रायजेसच्या नावाखाली फसवणुकीचा हा प्रकार घडला. या कंपनीच्या नावे दारावे येथे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्यानुसार खारघर सेक्टर ४५ व ५ येथे पाच भूखंडांवर इमारत उभारण्याचे कंपनीने जाहीर केले होते. तसेच या इमारतींमध्ये घर घेण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून लाखो रुपयांमध्ये अॅडव्हान्स देखील घेण्यात आला. जुलै २०१२ पासून त्यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपये अॅडव्हान्सच्या नावाखाली उकळले.
दरम्यान दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटला तरी इमारतीच्या बांधकामाला सुरूवात न झाल्याने संबधित ग्राहकांनी त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने काहींनी संबंधित भूखंडाच्या मालकीबाबत चौकशी केली. यावेळी ते भूखंड वेगळ्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली.
अद्याप १ कोटी ३१ लाख रुपयांच्या फसवणूक झाली असून यात ८० हून अधिक नागरिकांची फसवणुकीची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फांसो यांनी व्यक्त केली. त्यानुसार देव इंटरप्रायजेसचे मदन कोलंबकर, कंचन कोलंबकर, हेमचंद्र मिस्त्री, प्रमोद कोलंबकर व इशान शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
च्कंपनीच्या संचालकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने काहींनी संबंधित भूखंडाच्या मालकीबाबत चौकशी केली. यावेळी ते भूखंड वेगळ्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले.