भावी वकिलांच्या परीक्षेत गोंधळ; हॉल तिकीट वेळेवर नाही, पेपरही उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:04 AM2018-12-24T07:04:24+5:302018-12-24T07:04:31+5:30
बार कौन्सिल आॅफ इंडियाची परीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र, काहींना हॉलतिकीट मिळाले नाही, तर परीक्षेवेळी महाराष्ट्रातील काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
मुंबई : बार कौन्सिल आॅफ इंडियाची परीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र, काहींना हॉलतिकीट मिळाले नाही, तर परीक्षेवेळी महाराष्ट्रातील काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
रविवारी बार कौन्सिल आॅफ इंडियाची देशभरात परीक्षा होती. दरम्यान, हॉलतिकीट न मिळाल्याने मागील आठवडाभर दिल्ली कार्यालयात पाठपुरावा करत असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. तर, रविवारी राजर्षी शाहू महाराज कॉलेज, विक्रोळी आणि डी.वाय. पाटील कॉलेज, नेरूळ येथे १० वाजता सुरू होणारी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे प्रश्नपत्रिका उशिराने आल्याने परीक्षा तासभर उशिराने सुरू झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स देण्यात आल्या. त्यावर बारकोड क्रमांकही नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावात परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.
‘राज्यात स्वतंत्र कक्ष गरजेचा’
विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी महाराष्ट्रात कोणतीच व्यवस्था नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना त्यासाठी दिल्लीला मेलद्वारे संपर्क साधावा लागत आहे. त्यामुळे केंद्राच्या परीक्षांसाठी राज्यात स्वतंत्र कक्षाची, समितीची व्यवस्था असायला हवी. बार कौन्सिल आॅफ इंडियाने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिल्ली बार कौल्सिल आॅफ इंडियाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘परीक्षेसाठी दिली वाढीव वेळ’
बार कौन्सिल आॅफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सतीश देशमुख यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ दिल्याने त्यांचे कोणतेही नुकसान न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई विद्यापीठाची पहिली आॅनलाइन पेट परीक्षा गोंधळात
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार, २३ डिसेंबर रोजी प्रथमच आॅनलाइन घेण्यात आली. यावेळी मराठी, इतिहास यासारख्या विषयामध्ये पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा रिसर्च मेथोडोलॉजीचा हा पेपर ५० गुणांचा रिसर्च मेथोडोलॉजीचा पेपर आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेवेळी गोंधळाचे वातावरण होते. रिसर्च मेथोडोलॉजीचा पेपर सामाईक असल्याची पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अचानक हा पेपर दिल्याने प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांसाठी कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
तर, सामाईक विषय असल्याने तो सर्वांसाठी बंधनकारक होता, तशी कल्पना आधीच देण्यात आली होती, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यूजीसीच्या निर्णयानुसार या वर्षीपासून रिसर्च मेथडॉलॉजीचा विषय ५० गुण आणि ऐच्छिक विषयाचा पेपर ५० गुण अशा प्रकारे ही परीक्षा आॅनलाइन घेतल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.