पैशासाठी बलात्काराची खोटी फिर्याद

By admin | Published: March 2, 2016 03:25 AM2016-03-02T03:25:14+5:302016-03-02T08:34:47+5:30

ठरलेल्या मुदतीत घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अद्दल घडविण्यासाठी आपण बलात्काराची खोटी फिर्याद दाखल केली

False prosecution of money for money | पैशासाठी बलात्काराची खोटी फिर्याद

पैशासाठी बलात्काराची खोटी फिर्याद

Next

मुंबई : ठरलेल्या मुदतीत घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अद्दल घडविण्यासाठी आपण बलात्काराची खोटी फिर्याद दाखल केली, अशी कबुली फिर्यादीनेच दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच बलात्काराच्या आरोपीस जामीन मंजूर केला. या खोट्या फिर्यादीमुळे आरोपीला निष्कारण वर्षभर तुरुंगात राहावे लागले, याविषयी न्यायालयाने खेद व्यक्त केला.
भीमाबाई हुळ्ळी नावाच्या महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याची फिर्याद नोंदविल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिसांनी विजय राजेंद्र यादव या विवाहित इसमास गेल्या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. गेल्या ८ जुलै रोजी उच्च न्यायालयाने विजयचा जामीन फेटाळला होता. विजयने जामिनासाठी पुन्हा केलेल्या अर्जावर न्या. साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी सुरू असता फिर्यादी भीमाबाई व तिची मुलगी न्यायालयापुढे हजर झाल्या व त्यांनी विजयविरुद्ध आपण बलात्काराची खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली.
भीमाबाईने प्रतिज्ञापत्र करून न्यायालयास सांंगितले की, माझ्या मुलीचे विजयवर प्रेम होते. तिने त्याच्याशी स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवले व त्यातून गरोदर राहिल्यावर तिने स्वत:हून गर्भपात करून घेतला. दोघांच्या या संबंधांची आपल्याला पूर्ण कल्पना होती. विजयच्या घरीही ही गोष्ट माहीत होती.
भीमाबाईने असेही सांगितले की, घरात साठवून ठेवलेले १.७ लाख रुपये माझ्या मुलीने चोरून नेऊन विजयला दिले. हे पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यावर विजयने प्रत्येकी ३० हजार रुपये दोन वेळा चेकने परत केले. यापैकी शेवटचा चेक त्याने गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी दिला व राहिलेले पैसे दहा दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. त्याने पैसे परत न केल्यावर घरच्या मंडळींनी खूप दबाव आणला व त्यामुळे त्याला अद्दल घडविण्यासाठी आपण पोलिसांकडे जाऊन विजयविरुद्ध बलात्काराची फिर्याद नोंदविली.
भीमाबाईच्या म्हणण्यानुसार विजयला अटक झाल्यावर त्याच्या आईने राहिलेले पैसे परत केले. त्यानंतर आपण चौकशी केली तेव्हा विजय अजूनही तुरुंगात असल्याचे कळले. पोलिसांकडे जाऊन आपल्याला फिर्याद मागे घ्यायची आहे, असे सांगितले. पण वकिलामार्फत हे न्यायालयास सांगावे, असे पोलिसांनी सांगितल्याने आपण व आपली मुलगी आता न्यायालयात येऊन ही कबुली देत आहोत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: False prosecution of money for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.