नवी शक्कल; सोने तस्करांनी दिला मेटल डिटेक्टरला चकवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:03 AM2022-01-25T09:03:34+5:302022-01-25T09:04:00+5:30
सोन्याची पेस्ट दिसलीच नाही. २१ जानेवारीला शारजाहहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली हेरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले
मुंबई : सोने तस्करीला रोखण्यास मुंबईविमानतळावर अत्याधुनिक मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, या तंत्रज्ञानाला चकवा देण्यासाठी तस्करांनी अनोखी शक्कल लढविली. सोन्याची पेस्ट केल्यास ती डिटेक्टरमध्ये ट्रेस होत नसल्याने या पद्धतीचा वापर करून परदेशातून भारतात सोने आणले जात असल्याचे समोर आले आहे.
२१ जानेवारीला शारजाहहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली हेरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. त्याच्या साहित्याची तपासणी केली असता, १.८ किलो सोन्याची पेस्ट आढळून आली. त्याचे बाजारमूल्य ७५.५ लाख इतके आहे.
या प्रकरणाचा मागोवा घेतला असता, अर्ध द्रव स्वरूपात आणलेले सोने डिटेक्टरद्वारे ट्रेस होत नसल्याचे समोर आले. शारजाहहून आलेल्या या सुदानी नागरिकाची तपासणी केली नसती तर तस्करीचा हा नवा प्रकार समोर आला नसता. मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या इतर विमानतळांच्या तुलनेत अधिक असल्याने प्रत्येकाची फिजिकल तपासणी शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारची तस्करी रोखणे आव्हानात्मक असल्याचे एका सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले.
कशी बनवतात पेस्ट?
आधी सोन्याची भुकटी तयार केली जाते. त्यानंतर ते नायट्रिक ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये विरघळवले जाते. या प्रक्रियेला ‘एक्वा रेजीया’ म्हणतात. यानंतर सोन्याची पेस्ट तयार होते. पुन्हा त्यावर रासायनिक प्रक्रिया करून मूळ स्वरूपात सोने परत मिळवता येते.