डिप्पी वांकाणी, मुंबई याकूब मेमनला फाशी दिली जाईल, तेव्हा नियमानुसार त्याच्या नातेवाइकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. पण या विषयावर संशोधन करणारे संशोधक, मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ फाशीच्या वेळी तुरुंग अधीक्षकांच्या विशेषाधिकारात उपस्थित राहू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना तशी विनंती करावी लागेल. वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञाने ‘लोकमत’ला सांगितले की, ही मागणी मान्य झाली तर संशोधनाला मोठा लाभ होईल. भारतातील कारागृह व्यवस्थापन आणि देखरेखीसाठीची नियमावली पोलीस संशोधन आणि विकास खात्याने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कैद्याला फाशी देताना नातेवाइकांना उपस्थित राहू दिले जात नाही. पण सामाजिक संशोधकांनुसार तुरुंग अधीक्षकांनी परवानगी दिली तर संशोधकांना उपस्थित राहता येईल. तुरुंग नियम कलम ११.५६ नुसार कैद्याचे नातेवाईक व तुरुंगातील कैदी यांना कैद्याला फाशी दिली जाताना उपस्थित राहता येत नाही. पण तुरुंग अधीक्षक सामाजिक संशोधक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांना आरोपीच्या फाशीच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकतील. सामान्य धोरणाचा भाग म्हणून इतरांना तेथे उपस्थित राहता येत नाही. वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसुफ माचिसवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘जे कोणी अशा विषयांवर संशोधन करीत आहेत त्यांना जर अशा घटनांच्या वेळी तेथे उपस्थित राहण्यास मिळणार असेल तर त्यामुळे संशोधनाला लाभ मिळेल.’’फाशीच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती का, असे विचारता नागपूर कारागृहाचे अधीक्षक म्हणाले की, अशी काही तरतूद असल्याचे मला माहिती नाही. भारतातील कारागृहांच्या व्यवस्थापनाबाबत नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने जी माहिती पोस्ट केली आहे त्यात तशी तरतूद असल्याचे त्यांना सांगितल्यावर देसाई यांनी आम्ही त्याचे पालन करीत नसल्याचे म्हटले. त्या पुस्तिकेतील कलमांनुसार सगळ्या फाशींच्या वेळी ज्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेले आहे त्यात अधीक्षक, उपअधीक्षक, प्रभारी सहायक अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तज्ज्ञ होऊ शकतात फाशीचे साक्षीदार
By admin | Published: July 25, 2015 1:42 AM